Shiv Sena BMC Election: शिवसेनेत (Shiv Sena) अभूतपूर्व बंडखोरी घडवून आणणारे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सत्ता उलथवून टाकणारे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आता मुंबईवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर महापालिका निवडणुकांचं आव्हान असणार आहे. त्यातही मुंबई महानगरपालिका ही महत्वाची असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातून राज्यातील सत्ता हिसकावल्यानंतर आता गेली 25 वर्ष ठाकरेंच्या ताब्यात असलेली महापालिका सुद्धा काढून घेण्याचा शिंदे गटाने प्रयत्न सुरू केला आहे.
मुंबई महापालिकेवर शिंदेंचा की ठाकरेंचा भगवा फडकणार, याची चर्चा सुरू आहे. आगामी काळात सर्वच पक्ष आपला झेंडा महापालिकेवर फडकवण्याचं स्वप्न पाहत आहेत. टीम एकनाथ शिंदेंनी तयारीसुद्धा करायला घेतली आहे.
पक्षात नव्यानं आलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. त्याशिवाय आगामी काही दिवसात शिवसेना ठाकरे गटातील आणखी काही माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्षात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात भाजपच्या साथीनं पालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक जिंकून आणण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नियोजनदेखील केले आहे.
काय आहे नियोजन?
सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट मुंबईच्या वॉर्डा-वॉर्डात जाणार आहेत. शासकीय योजनांची जत्रा लवकरच सुरू करणार आहेत. ज्यांच्या माध्यमातून
मुंबईतील तळागाळातल्या लोकांना शासकीय लाभ घेता यावा, यासाठी ही योजना असणार आहे. लवकरच हे अभियान मुंबईत प्रत्येक वार्डात सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती घरा घरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांची संख्या आणखी वाढवली जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईत शिवसेना-शिंदे गटाकडून सणांनुसार आता विविध उपक्रम राबवले जाणार आहेत
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. त्यात मुंबईत भाजपची ताकद असली, तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी हि पहिलीच निवडणुक असणार आहे. बंडाच्या आधी शिंदे ठाकरे एकत्र लढत आले आहेत पण आता शिंदेसाठी अग्निपरीक्षा असणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आता मुंबईकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुंबईत 95 नगरसेवक आहेत. आतापर्यंत त्यापैकी 2017 च्या निवडणुकीतले 10 माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. तर त्याआधीचे 11 माजी नगरसेवक सोबत आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल तेव्हा, हौशे, नवशे, दुखावलेले तिकिटांच्या आशेने शिंदे गटात सामील होऊ शकतात, असा अंदाज आहे. या सर्व नाराजांची शोधमोहिम घ्यायला शिंदे गटाकडून सुरुवात झाली आहे
शिवसेना ठाकरे गटाची बांधणी गटप्रमुखापासून ते विभागप्रमुखापर्यंत आहे. जुने पदाधिकारी शिंदेंसोबत गेल्यानं नव्यांना संधी दिली गेली आहे. शिंदेना ठाकरेंशी काडीमोड होऊन काहीच महिने झाले आहेत. शिंदेंना मुंबईत आपलं अस्तित्व दाखवायचं असेल. तर तळागाळात थोडी मेहनत घ्यावी लागेल तर कुठे पालिकेच्या शर्यतीत टिकत येईल असे म्हटले जात आहे.