Damage to agricultural crops : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या अतिवृष्टीमुळं अने ठिकाणी शेती पिकांना (Agricultural crops) मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यात देखील सोयाबीन, उडीद भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. केवडमधील एका शेतकऱ्यांचं पाच एकरवरील सोयाबीन (soybeans) अतिवृष्टीमुळं वाया गेलंय. जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यानं दिलंय. निलेश सुरेश लटके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. याबाबात सरकारनं त्वरीत आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.




 तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांची पिकं पाण्यात


माढा तालुक्यात विविध ठिकाणी गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं हाती आलेली शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. काही शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन या पिकांची काढणी केली आहे. त्या शेतकऱ्यांची पिकं पावसाच्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी अद्याप पिकांची काढणीच झालेली नाही. अशातच झालेल्या या अतिवृष्टीमुळं शेती पिकांना फटका बसलाय. पिकांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळं सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. 




सोसाबीनचे उत्पादन घेण्यासाठी एकरी 12 ते 13 हजार रुपयांचा खर्च


निलेश लटके यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसापासून माढा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं तीन दिवसापासून पाच एकर सोयाबीन पाण्यात आहे. यामुळं सोयाबीनच्या शेंगा पूर्णता खराब झाल्या आहेत. त्यामुळं यातून अपेक्षीत उत्पन्न मिळण्याची शक्यता खूप कमी असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. दरम्यान, सोसाबीनचे उत्पादन घेण्यासाठी एकरी 12 ते 13 हजार रुपयांचा खर्च आला आहे. यापुढे हे सोयाबीन काढणीचा खर्च वेगळाच होणार आहे. तर यातून मला दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत होते. मात्र झालेला खर्चही यातून निघणे अवघड आहे. त्यामुळं सरकारनं त्वरीत माढा तालुक्यातील नुकसानग्रस शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. 




एका बाजूला आस्मानी, दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट


दरम्यान, सध्या एका बाजूला सोयाबीनला बाजारात अपेक्षीत दर मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान होत आहे. असं दुहेरी संकट बळीराजावर आलं आहे. एका बाजूला आस्मानी संकटानं बळीराजाला गाठलेलं दिसत असताना दुसऱ्या बाजूला सुलतानी संकटानं देखील शेतकऱ्यांला घेरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी शेती पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. त्या ठिकाणी शासनानं त्वरीत मदत द्यावी ही मागणी शेतकरी करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


अतिवृष्टी! दोन दिवसांत नांदेडमधील 9 हजार हेक्टर शेती खरडून गेली; 2 लाख हेक्टरवरील पिके आडवी