Silver Price News : भारतात सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. या उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी (Gold and Silver) केली जाते. दरम्यान, सध्या सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या परताव्याच्या बाबतीत विचार केला तर सोन्यापेक्षा चांदीला चांगलाच परतावा मिळत आहे. अशा परिस्थितीत चांदीची किंमत 1 लाखाच्या पुढे जाऊ शकते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भारतात, सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची खरेदी वाढते, कारण धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली जाते. सणांनंतर लग्नाचा हंगाम येतो. त्यामुळे देशात सोन्या-चांदीची औद्योगिक मागणी वाढते. अशा परिस्थितीत जे लोक सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करतात ते अल्पावधीत भरपूर कमाई करतात.
सोन्यापेक्षा चांदीने दिला जास्त परतावा
सोन्या-चांदीच्या किंमतींचा आढावा घेतला तर, गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवरून असे दिसून येते की चांदीचा परतावा चांगला झाला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने आपल्या व्याजदरात 0.5 टक्क्यांनी कपात केल्यापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने दर कपात केल्यापासून, चांदीच्या किमतीत 5 टक्के वाढ झाली आहे, तर या काळात सोन्याचे दर केवळ 3.5 टक्के वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारही मोठ्या प्रमाणात चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत.
चांदीच्या दरात वाढ होण्याचं कारण काय?
चांदीच्या किमतीत वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याचा औद्योगिक वापर. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते बॅटरी आणि सेमीकंडक्टरपर्यंत प्रत्येक गोष्टीत चांदीचा वापर केला जातो. दरम्यान, चीनच्या सेंट्रल बँकेनेही व्याजदरात कपात केली आहे, त्यामुळे चांदीची औद्योगिक मागणी वाढली आहे. त्यामुळे चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
चांदीचा दर 1 लाखाच्या पुढे जाईल का?
सध्या भारतात चांदीची किंमत 93,000 रुपये प्रति किलो आहे. यामध्ये 3 टक्के GST समाविष्ट आहे. दरम्यान चांदीची मागणी वाढल्यास आणखी दरात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जातेय. सराफा बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 6 ते 9 महिन्यांत चांदीचे भाव 1 लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 31.18 डॉलर प्रति औंस आहे.
दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. त्यामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको असा प्रश्न पडत आहे.
महत्वाच्या बातम्या: