Sugarcane Farming : उसासारख्या नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कायमच ओढा असतो. मात्र, यावर्षी उसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे खूप उशीरा शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात आहे. तब्बल 17 ते 18 महिन्यानंतर ऊस कारखान्याला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, एका शेतकऱ्याने तब्बल 17 महिन्यानंतर आपला ऊस कारखान्याला गेला म्हणून जंगी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला आहे. चार तास मिरवणूक काढून या शेतकऱ्याने जल्लोष केला. या शेतकऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बघतोस काय रागाने ऊस घातलाय वाघाने असाच काहीसा प्रकार घडला आहे. 


लातूर जिल्ह्यातील भादा या गावात नामदेव बनसोडे या शेतकऱ्याचा दोन एकर ऊस आहे. ऊस लागवडीला तब्बल 17 महिने झाले होते. मात्र, ज्या कारखान्याच्या भरवश्यावर ऊस लावला होता त्यांनी ऊस नेलाच नाही. अनेकवेळा कारखान्याच्या अधिकाऱ्यांना भेटूनही झाले. परिस्थिती सांगितली मात्र उपयोग झाला नाही. मोठी मेहनत घेत ऊस जोपासला होता. हाती काहीच लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली. अखेर हतबल झालेल्या नामदेव यांनी दुसऱ्या कारखान्यास संपर्क करत एक संधी घेतली. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांचा ऊस नेण्यात आला. शेवटची गाडी जाताना जल्लोष करायचा हे नामदेव यांनी ठरवले होते. त्यानंतर मग त्यांनी तयारी सुरु केली आणि ट्रॅक्टर सजवला. तसेच हलगी आणि बँड लावण्यात आला. 4 तास गावाभरातून मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ग्रामदेवताला नारळ वाढवला. तसेच ऊस तोड कामगारांचा सन्मान करण्यात आला.




नामदेव यांच्याकडे तीन साखर कारखान्याचे शेअर्स आहेत. त्यामध्ये 21 शुगर प्रा लिमिटेड, विठ्ठल साई साखर साखर कारखाना मुरुम आणि मूलचंद शुगर प्रा लिमिटेड नितली उस्मानाबाद या कारखान्याचे सभासद नामदेव आहेत. मात्र अनेक महिने वाऱ्या करुनही कोणीही दाद दिली नाही. हतबल झालेल्या नामदेव यांनी मग श्री साई शुगर प्रा लिमिटेड गोंद्री कारखान्यास संपर्क केला. त्या कारखान्याने अवघ्या चारच  दिवसात ऊस नेल्याने शेतकऱ्याने जल्लोष केला. दरम्यान, नामदेव यांचा जल्लोष पहाण्यासाठी गावकरीही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या प्रकारचा सन्मान कधी ऊसतोड कामगारांना मिळाला नसेल. उसतोड कामगारही या मिरवणुकीत बेभान होऊन नाचले. ट्रॅक्टर चालकही यामध्ये सहभागी झाला होता.




सभासद असलेल्या कारखाना ऊस नेत नव्हता. ऐनवेळी दुसऱ्या कारखान्याने ऊस नेला. त्यामुळे तब्बल चार तास मिरवणूक काढून नामदेवने जल्लोष केला. ज्या कारखान्याने ऊस नेला नाही त्याच्या नाकावर टिचून दुसऱ्या कारखान्यात ऊस घातला. "बघतोस काय रागाने ऊस घातला वाघांना "...."नादच केला पण उसच गेला " अशी स्थिती तयार झाली. नामदेव यांनी नाद खुळा जल्लोष केला. तो सगळ्या गावाने बघितला. या प्रकारची पंचक्रोशीत चर्चा होत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: