Swabhimani Shetkari Sanghatana : उसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी अद्याप अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना उस कारखान्याला घालण्यासाठी मोटा संघर्ष करावा लागला. दरम्यान, ऊस तोडीसाठी शेतकऱ्यांना एकरी पाच ते वीस हजारापर्यंत रक्कम मोजावी लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून व्याजाने पैसे घेवून मुकादमाला पैसे दिले आहेत. या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रवक्ते आणि सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले. तोडीसाठी  दिलेले पैसे शेतकऱ्यांना  परत द्या किंवा ऊस बिलातून तोडीची रक्कम कपात बंद करा अन्यथा साखर कारखान्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा खराडे यांनी दिला आहे.


याबाबत आम्ही साखर आयुक्त शेखर गायकवाड निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे परत करा, शेतकऱ्यांना एकाच कामासाठी दोनदा पैसे द्यावे लागतात. काम एकदा आणि पैसे दोनदा होत आहे.
एकतर कपात बंद करा, मजुरांच्या बिलातून कपात करुन द्या अशी मागणी केल्याचे खराडे यांनी सांगितले. याबाबत तक्रारी करा पैसे मिळवून देतो असे आश्वासन साखर आयुक्तांनी दिल्याचे महेश खराडे यांनी सांगितले.


उस तोडणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून पैसे दिले आहेत. या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी संबधित मुकादम, वाहन चालक, मशीन मालक यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. यासाठी ऊस ज्या कारखान्याला गेला आहे त्या कारखान्याचे नाव, शेतकऱ्यांचे नाव, गाव, मुकादमाचे नाव, गाव, चालकाचे नाव, मशीन मालकाचे नाव या सर्वांनी घेतलेली रक्कम अशी सविस्तर माहिती संकलित करावयाची आहे. ही तक्रार संबधित साखर कारखाना व साखर आयुक्ताकडे करावी असेही खराडे म्हणाले.
 
शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घ्या, खात्री करा आणि मुकादम, वाहन चालक, मशीन मालक यांच्या बिलातून ही रक्कम कपात करुन शेतकऱ्यांना परत द्या किंवा प्रती टन  ऊस बिलातून ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कारखाने 600 ते 700 रुपये कपात करतात. ती कपात बंद करा. कारण साखर कारखाने जर तोडणीचे पैसे कपात घेवूनसुद्धा पुन्हा तोडणीसाठी पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागत असतील तर कपात कशासाठी हा मुख्य प्रश्न आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनो ऊस तोडणीसाठी सुरु असलेली दुहेरी लूट थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे. प्रथम तक्रार करुन साखर कारखानदाराशी चर्चा केली जाईल, त्यानंतर प्रत्येक कारखान्यावर मोर्चाचे आयोजन केले जाईल असा इशारा खराडे यांनी दिला आहे.


जेवढे जास्त शेतकरी सहभागी तेवढे या लढ्याला यश येईल. सध्या ही दुहेरी लूट सुरु आहे. साखर कारखानेही ऊस बिलातून तोडणीचे पैसे कपात करतात आणि मजूरही तोडीसाठी पैसे घेतात. एकाच कामासाठी दोन दोनदा पैसे द्यावे लागत आहेत. लक्ष्यात ठेवा कंडक्टर एक रुपया कमी असेल तर एसटीतून खाली उतरवतो, कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात कोणत्याही वस्तूचे बिल एक रुपयाही कमी घेतले जात नाही, मोबाईल रिचार्जसाठी पैसे कमी असतील तर  रिचार्ज होत नाही, कृषी दुकानदार उधार देत नाही, उधारी असेल तर ज्यादा भाव लावतो म्हणजे प्रत्येक जण एक रुपयाचाही विचार करतो. जो पैशाचा विचार करतो तोच पुढे जातो त्याचीच प्रगती होते, त्याचीच घरे दुमजली होतात, त्याच्याच घरापुढे चार चाकी गाडी उभी राहते हे वास्तव आहे. त्यामुळे हजारो रुपये वाचविण्यासाठी संघर्ष करायला तयार व्हा, असे खराडे म्हणाले. जावू दे की पाच दहा हजाराने काय फरक पडणार आहे ही वृत्ती सोडून द्या, लक्षात ठेवा म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावता कामा नये असेही खराडे म्हणाले. आपल्या जावू दे की या वृत्तीमुळेच बाहेर गावाहून आपल्याकडे जगायला आलेली, झोपडीत राहणारी  तोडकरी माणसेही लुटायला लागली हे वास्तव नाकारु नका. आता ऊस गेलेला आहे त्यामुळे ऊस जाईल की नाही याची भीती नाही त्यामुळे लढा दिला, संघर्ष केला तर काही तरी पदरात पडेल असे खराडे यांनी सांगितले.