UP Election Voting : आज उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 9 जिल्ह्यातील 59 जागांवर आज मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, रायबरेली, पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, फतेहपूर, बांदा आणि उन्नावमधील या जिल्ह्यातील 59 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत आजची मतदान प्रक्रिया चालणार आहे.  


या टप्प्यात एकूण 2.12 कोटी मतदार मतादानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात 624 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. 2017 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या 59 पैकी 51 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय समाजवादी पार्टीला  चार, बसपाला तीन आणि भाजपचा मित्रपक्ष अपना दलला एक जागा मिळाली होती.


चौथ्या टप्प्याचा प्रचार अत्यंत 'हाय व्होल्टेज' होता. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात जोरदार ताकद लावली होती. भाजपने यावेळी पुन्हा सत्ता हातात देण्याचे वहन मतदारांना केले आहे. तर अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपा आघाडीने भाजपच्या अपयशाची मोजणी करत मतदारांकडून मते मागितली आहेत. आपल्या बहुतांश सभांमध्ये अखिलेश यांनी दावा केला आहे की, निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यात सपा आघाडीला जोरदार पाठिंबा मिळाला असून, यावेळी निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक पराभव होईल. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही अनेक रॅली घेतल्या आहेत. मायावतींनी सपा, भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. फक्त बसपाच राज्यातील जनतेला खरे सुशासन देऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.


या प्रमुख नेत्यांचे भवितव्य पणाला 


चौथ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या प्रमुख उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रिजेश पाठक आहेत. जे लखनौ कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना दोन वेळा सदस्य राहिलेले सुरेंद्र सिंग गांधी उर्फ ​​राजू गांधी यांच्याशी होणार आहे. पाठक 2017 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत लखनौ मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. उत्तर प्रदेशचे आणखी एक मंत्री आशुतोष टंडन लखनौ पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सरोजिनीनगर विधानसभा जागेवर भाजपने रिंगणात उतरवलेले माजी ईडी अधिकारी राजेश्वर सिंह आणि सपा सरकारमधील माजी मंत्री अभिषेक मिश्रा यांच्यात लढत होणार आहे. डॉ. नीरज बोरा लखनौ उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. येथे त्यांची स्पर्धा विद्यार्थी नेत्या समाजवादी पक्षाच्या पूजा शुक्ला यांच्याशी आहे. यूपी विधानसभेचे उपसभापती नितीन अग्रवाल यांनाही या टप्प्यात निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.