Rice Production : केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Union Ministry of Agriculture) 2021-22 साठीच्या प्रमुख कृषी पिकांच्या उत्पादनाचा चौथा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये मका, हरभरा, कडधान्य, तांदूळ तसेच उसाच्या उत्पादनात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज सांगितला आहे. देशात यंदा अन्नधान्याचे उत्पादन 315.72 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन 2020-21 च्या तुलनेत 4.98 दशलक्ष टन जास्त असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. तसेच तांदळाचे उत्पादन (Rice Production) हे 130.29 दशलक्ष टन अपेक्षित आहे. हे उत्पादन विक्रमी होणार असल्याचे केंद्र सरकारनं म्हटले आहे.


2021-22 मधील उत्पादन मागील पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) अन्नधान्याच्या सरासरी उत्पादनापेक्षा 25 दशलक्ष टनांनी जास्त असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. तांदूळ, मका, हरभरा, कडधान्ये, रेपसीड, मोहरी, तेलबिया आणि उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढ्या पिकांचे विक्रमी उत्पादन हे केंद्राच्या शेतकरी हिताचे धोरण आणि शेतकऱ्यांची मेहनत तसेच शास्त्रज्ञांच्या परिश्रमाचे परिणाम असल्याचे मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले आहे.


तांदळाचे उत्पादन विक्रमी 130.29 दशलक्ष टन होण्याचा अंदाज


अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज 315.72 दशलक्ष टन असताना, तांदळाचे उत्पादन 130.29 दशलक्ष टन अपेक्षित आहे. हे उत्पादन विक्रम असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. तर यंदा गव्हाचे उत्पादन 106.84 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचू शकते. त्याचबरोबर पोषक, भरड तृणधान्यांचे उत्पादन 50.90 दशलक्ष टन असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2021-22 मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन 130.29 दशलक्ष टन विक्रमी असल्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरी 116.44 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा ते 13.85 दशलक्ष टनांनी तांदळाचे उत्पादन जास्त आहे. 2021-22 मध्ये गव्हाचे उत्पादन 106.84 दशलक्ष टन एवढा अंदाजित आहे. गेल्या पाच वर्षांच्या 103.88 दशलक्ष टन सरासरी गव्हाच्या उत्पादनापेक्षा ते 2.96 दशलक्ष टनांनी जास्त असल्याचे कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे.


तांदळाच्या उत्पादनात घट होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज


यावर्षी देशात तांदळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. यंदा म्हणजे 2022-23 मध्ये तांदळाच्या उत्पादनात जवळपास 10 दशलक्ष टनांची घट होण्याची शक्यता आहे. कारण, चालू खरीप हंगामात तांदळाच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. तसेच काही ठिकाणी पावसाची कमतरता देखील आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावर्षी तांदळाचे उत्पादन 10 दशलक्ष टनांची घटून 120 दशलक्ष टनांवर येऊ शकते अशी माहिती देखील व्यापाऱ्यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: