सिंहांच्या संवर्धनासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी 'जागतिक सिंह दिन' साजरा केला जातो. जागतिक सिंह दिनाची सुरुवात 2013 साली करण्यात आली. सिंहांची घटती संख्या आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी जगभरातील देशांनी पुढाकार घ्यावं असं आवाहन या दिवशी केलं जातं. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर अॅनिमल्स (WWF) च्या मते, सिंहाला जरी जंगलचा राजा म्हटलं जातं. सिंह हा केवळ पठारी प्रदेश आणि गवताळ प्रदेशातच आढळतो. एकेकाळी आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या सिंहांची संख्या आता घटत चालली आहे. अवैध शिकार, अधिवास नष्टता, संवर्धनासाठी तोकडे प्रयत्न अशा अनेक कारणांमुळे जगभरातील सिंहांच्या संख्येत घट होत आहे. भारतात आशियायी सिंह हे गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानात सापडतात. एकीकडे जगभरात सिंहांच्या संख्येत कमी येत असताना गुजरातमधील गीर सिंह प्रकल्पातील सिंहांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे.