ब्रिटननंतर आता महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाच्या नवीन धोकादायक एरिस व्हेरियंटचा (ERIS ) पहिला रुग्ण आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. ब्रिटनसह काही देशांमध्ये काही दिवसांपूर्वीच एरिस कोरोना व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. भारतात या एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण मे महिन्यातच सापडला होता. मे महिन्यात महाराष्ट्रात नवीन सबवेरियंट आढळून आला होता, असं समोर आलं आहे. मात्र, त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात या व्हेरियंटचा कोणताही नवीन रुग्ण सापडलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, एरिस कोरोना व्हेरियंटची मुख्य लक्षणे ओमायक्रॉन सारखीच आहेत. यामध्ये घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, कफ असलेला खोकला, स्नायू दुखणे आणि वास कमी होणे. दरम्यान, कोरोना रुग्णांमध्ये दम लागणे, वास कमी होणे आणि ताप ही आता मुख्य लक्षणे नाहीत. तज्ज्ञांच्या मते, या नवीन व्हेरियंटमुळे ब्रिटनसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा नवीन कोविड लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.