स्तनपानामुळे स्तन गळतात, स्तनपान करणाऱ्या महिलेला चव नसलेलं अन्न खावं लागतं अशा बऱ्याच गैरसमजुती पसरवल्या जातात.

याचा परिणाम असा होतो की बाळाची आई कितीही प्रयत्न केले तरी या गैरसमजुतींना बळी पडते. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने या गैरसमजुती दूर करुया

पहिली गैरसमजूत: स्तनपानाच्या काळात गर्भधारणा होत नाही.

सत्य हे आहे की तुम्ही स्तनपान करत असला तरी प्रसुतीनंतर तीन महिन्यांनी पुन्हा गर्भधारणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भनिरोधाच्या पर्यायांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.



दुसरी गैरसमजूत: स्तनात दुधाच्या गाठी झाल्यास त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नये.

सत्य हे आहे की ही बाब चुकीची असून स्तनाच्या नसा साकळल्या असतील तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ही काळजी घेत असताना स्तनांना गरम पाण्याने शेकणं किंवा त्यांना हलक्या हाताने मसाज करणं फायदेशीर ठरतं.

तिसरी गैरसमजूत: स्तनपानानंतर तुमचे स्तन कायमचे गळतात.

सत्य हे आहे की गर्भारपणात स्तनांचे वजन दुपटीने वाढते. तुम्ही स्तनपान करा अथवा करु नका, स्तनाच्या वाढलेल्या वजनामुळे स्तनांना घट्ट ठेवणाऱ्या लिगामेंटवर ताण येतो. हा ताण जेवढा वाढत जातो तेवढे स्तन गळतात.

चौथी गैरसमजूत: स्तनपान करणाऱ्या महिलेने बेचव अन्न खावे, चमचमीत खाद्यपदार्थ खाऊ नये.

सत्य हे आहे की स्तनपान करणारी महिला जे अन्न खाते ते पचून त्याचा वापर बाळासाठी दूध करण्यात होईपर्यंत त्या खाद्यपदार्थातील बरे-वाईट घटक हे पचलेले असतात आणि त्याचा बाळावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलू नका.

पाचवी गैरसमजूत: डार्क बिअर प्यायल्याने जास्त दूध निर्माण होतं.

सत्य हे आहे की याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. खरंतर अति दारु प्यायल्याने शरीरातील प्रोलॅक्टीन पातळी कमी होते. हे एक प्रकारचे संप्रेरक म्हणजेच हार्मोन असून त्यावर मातेच्या शरीरातील दुधाचे प्रमाण अवलंबून असतं. डब्लूएचओने सांगितले आहे की, स्तनपान करणाऱ्या महिलांनी दारु पिणं टाळलं पाहिजे.