टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे आज (23 ऑगस्ट) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील व्हिडीओंमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. सोनाली फोगाट यांनी आपल्या तिच्या करिअरची सुरुवात 2006मध्ये हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करण्यापासून केली होती. दोन वर्षांनंतर 2008मध्ये सोनाली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून सोनाली भाजपच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली फोगाट सोशल मीडियावर खूप सक्रिय होत्या. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची माहिती त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली होती. सोनाली फोगाट यांनी पंजाबी आणि हरियाणवी म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले होते. 'अम्मा' या मालिकेत सोनाली यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सोनाली फोगाट यांनी बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या 14व्या सीझनमध्ये भाग घेतला होता.