शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 58 हजारांच्या जवळ, निफ्टी 17 हजारांच्या पुढे आज शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. जागतिक बाजारातील चांगल्या संकेतांमुळे भारतीय बाजारावर चांगला परिणाम दिसून येत असून भारतीय शेअर बाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे. आज बँकिंग, ऑटो, ऑइल आणि गॅस शेअर्समधील घोडदौडमुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सुरुवातीला बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 334.32 अंकांच्या म्हणजेच 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 57,963.27 च्या पातळीवर उघडला. एनएसईचा निर्देशांक निफ्टी 72 अंकांच्या म्हणजेच 0.42 टक्क्यांच्या वाढीसह 17,060.40 वर उघडला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांना मजबूती मिळाली आहे. हेवीवेट शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे. आज बाजारात आयटी, एफएमसीजी, फार्मा आणि हेल्थकेअर शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहे. मीडिया शेअर्स तेजीत आघाडीवर असून त्यामध्ये 1.2 टक्के वाढ झाली आहे. पीएसयू बँकेचे शेअर्स सुमारे एक टक्क्यांनी वाढले आहेत. तेल आणि गॅस यासोबत ग्राहकोपयोगी वस्तूंचे शेअर्स 0.71 टक्क्यांनी वधारले आहेत. फायनँशियल सर्विस सेक्टर 0.55 टक्क्यांच्या तेजीसह व्यापार सुरू आहे.