जगभरातील आर्थिक मंदीची शक्यता असून त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. बुधवारीही देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय शेअर मार्केटसह जागतिक शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळाली. आज बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही प्रमुख देशांतर्गत इंडेक्सची सुरुवात घसरणीसह. प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये संमिश्र कल दिसून आला. सत्र सुरू होण्यापूर्वी सेन्सेक्स सुमारे 60 अंकांनी वर होता, तर निफ्टी सुमारे 10 अंकांनी घसरला होता. भारतीय शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये पडझड झाल्याचं पाहायला मिळालं. बाजारात व्यवहार सुरू झाला तेव्हा बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स सुमारे 15 अंकांच्या घसरणीसह 61,180 अंकांवर आला. निफ्टीही 10 अंकांनी घसरला आणि 18,100 अंकांच्या खाली राहिला. बुधवारी अमेरिकन बाजारातील मोठ्या घसरणीची प्रक्रिया सुरूच होती.