सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरेलच पण तेवढाच सुरक्षितही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 18 डिसेंबरपासून सुरू होणार्या सॉवरेन गोल्ड बाँड इश्यूची किंमत निश्चित केलीये. सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 6199 रुपये गुंतवावे लागतील. हा इश्यू पाच दिवस खुला राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नोव्हेंबर 2015 मध्ये सॉव्हरिन गोल्ड बाँडची सुरुवात केलेली. बॉण्डच्या पहिल्या हप्त्याची मुदत पूर्ण झाली आहे. आठ वर्षांत 12.9 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने ही शासकीय सुवर्ण रोखे योजना सुरू केली होती. योजना सरकारी असल्यामुळे गुंतवणुकीवर सरकारकडून सुरक्षिततेची हमी मिळते. गुंतवणूकदार हे डिजिटल सोने बाँडच्या माध्यमातून खरेदी करू शकतात. खरेदी केलेल्या सोन्याच्या रकमेसाठी गुंतवणूकदारांना समान किमतीचे सॉव्हरिन गोल्ड बाँड जारी केले जातात. बॉण्डच्या मॅच्युरिटीचा कालावधी 8 वर्ष आहे. पण, तुम्हाला 5 वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय देखील आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये तुम्ही 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता.