देशात पुन्हा एकदा थंडीची लाट आली आहे. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे थंडीमध्ये वाढ झाली आहे.
जम्मू आणि काश्मीरसह उत्तराखंडमध्येही जोरदार बर्फवृष्टी झाली आहे.
काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात चंदरकोट आणि बनिहाल दरम्यान अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्रीमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे.
गंगोत्रीमध्ये सध्या बर्फाची चादर पसरली आहे. येथील किमान तापमान -10 अंशांवर पोहोचले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारीही हवामान बदलण्याची शक्यता आहे.
उत्तरकाशी, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
हिमालच प्रदेशातही मधूनमधून हिमवृष्टी सुरु आहे. बागेश्वर केपिंडारी, फुर्किया, दिवाली येथे बर्फवृष्टी झाली आहे.
थंडी वाढली आहे. शेकोटी पेटवून लोक थंडीपासून स्वतःला वाचवत आहेत. नैनिताल आणि अल्मोडा येथे ढगाळ वातावरण आहे.
येत्या 24 तासांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये हिमवृष्टी, गारपीट, पाऊस, थंडीची लाट यांसह कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.
पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे सपाट राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढू शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.