श्रेया घोषाल ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. श्रेयाचा जन्म 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मात्र, ती लहानाची मोठी राजस्थानमध्ये झाली. सुमधुर गळा लाभलेली श्रेया ‘मेलडी क्वीन’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. श्रेया घोषाल 20 वर्षांपासून आपल्या गोड आणि जादुई आवाजाने श्रोत्यांचे मनोरंजन करत आहे. श्रेया रिअॅलिटी शोची परीक्षक देखील आहे. कधीकाळी स्वतः श्रेयादेखील अशाच एका स्पर्धेत सहभागी झाली होती. 'सा रे ग म प' हा रिअॅलिटी शो जिंकून वयाच्या 16व्या वर्षी श्रेयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या शोमधून आपल्या मधुर प्रवासाला सुरुवात करणाऱ्या श्रेयाने संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.