नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशीदेखील भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहारात खरेदी-विक्री दरम्यान जोर दिसून येत होता. त्यामुळे बाजारात अस्थिरता दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 126 अंकांच्या तेजीसह 61,294 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 37 अंकांच्या तेजीसह 18,234 अंकांवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात ऑटो, एफएमसीजी, मीडिया, एनर्जी आणि मेटल्स सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग, आयटी, फार्मा, हेल्थकेअरसारख्या सेक्टरच्या शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. मिड कॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला. एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ इन्सुरन्स, अॅक्सिस बँक, टायटन कंपनी, टीसीएसच्या शेअर दरात तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 12 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. त्यानंतर बाजारात खरेदीचा जोर वाढला.