'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागर कारंडे हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. आजवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागरने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. सागरने 'चला हवा येऊ द्या' या बहुचर्चित कार्यक्रमाला रामराम केल्याची बातमी समोर आली आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. तर कधी पोस्टमन काका बनून रडवलं आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागर कारंडेने आपल्या भावनिक शैलीत सादर केले आहेत. एकाचवेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम सागरला अचूक जमलं आहे. आता झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सागर कारंडेच्या पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने घेतलेली दिसत आहे. सागर कारंडे एक उत्कृष्ट अभिनेता आणि लेखक आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून सागरने वेगवेगळ्या विनोदी भूमिका सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सागरने छोटा पडदा गाजवण्यासोबत रुपेरी पडद्यावरदेखील काम केलं आहे.