मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी जोडी अर्थात अभिनेते सचिन आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा आज (17 ऑगस्ट) वाढदिवस आहे. विशेष म्हणजे दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. या जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणाऱ्या या जोडीची प्रेमकथाही अशीच खास आहे. एका मराठी चित्रपटाच्या सेटवर या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. लहानपणापासून सचिन पिळगावकर यांना अभिनय क्षेत्रात यायचे होते. सचिन यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा प्रचंड गाजला. या चित्रपटात त्यांनी सुप्रिया यांना मुख्य भूमिकेसाठी निवडले होते. या चित्रपटाच्या सेटवरच सचिन यांना सुप्रिया आवडू लागल्या होत्या. दोघांच्या वयात तब्बल 10 वर्षांचा मोठा फरक होता.