वाराणसीचा कायापालट केल्याबद्दल शिवसेनेचं मुखपत्र सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात आले आहे.



तसेच सामान्यांच्या प्रश्नांवर तत्परता दाखवावी असा चिमटाही सामनातून काढण्यात आला आहे.

हिंदुस्थानातील धार्मिक आणि तीर्थस्थळांचा विकास कोणी करत असेल तर त्यांचे कौतुक व्हायला हवे. राजकारण बाजूला ठेवून या विषयाकडे पाहायला हवे...



काशीत विश्वनाथ धामचा विकास झाला. त्याचे श्रेय काशीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच द्यावे लागेल, असे म्हणत शिवसेनेचं मुखपत्र सामनातून मोदींचे कौतुक करण्यात आले आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशीत जाऊन गंगेत स्नान केले. त्या गंगास्नानाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत...



विरोधकांविषयीची किल्मिषे नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार होवो, असा चिमटाही मोदींना काढण्यात आलाय.



तर मोदी हे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांचे गंगास्नान प्रकाशझोतात राहिले.



नाहीतर गंगेत रोज लाखो लोक डुबक्या मारीतच असतात, असा टोला देखील सामनातून लगावलाय.

मोदी यांच्या आधी अनेक हिंदुत्वप्रेमी खासदार तेथे येऊन गेले. काशीचा विकास करणे त्यांच्याही मनात होते



पण ते सर्वजण पंतप्रधान नसल्यामुळे काशी विश्वनाथ धाम उपेक्षित राहिले.



ज्या तत्परतेने काशीचा विकास घडवून आणला तीच तत्परता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखवायला हवी, असे सामनात म्हटले आहे.