दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण सध्या ऑस्करमुळे चर्चेत आहे. राम चरणच्या ब्लॉकबस्टर 'आरआरआर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. आता राम चरण भारतात परतला असून नुकत्याच एका मुलाखतीत त्याने हॉलिवूडच्या सिनेमात काम करण्याबद्दल भाष्य केलं आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत राम चरण म्हणाला की, हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास मी सज्ज आहे. राम चरण पुढे म्हणाला,सध्या यावर काम सुरु असून लवकरच मी याबद्दल घोषणा करेन. राम चरणने सिनेमाबद्दल अधिक माहिती दिली नसली तरी तो हॉलिवूडच्या सिनेमात झळकणार असल्याने त्याचे चाहते आनंदी असून ते आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. भारतात येण्याआधी अमेरिकेतदेखील एका मुलाखतीत राम चरणने हॉलिवूड सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. भारतात आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर राम आता जगभरातील चाहत्यांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. हॉलिवूडच्या सिनेमात राम चरण हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीटसोबत स्क्रीन शेअर करु शकतो. राम चरणचा 'आरआरआर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.