भारतामध्ये रोजच्या जेवणात हमखास बटाटा वापरला जातो. असे खूप कमी लोक आहेत, ज्यांना बटाटा खायला आवडत नाही. कडधान्य असो किंवा पालेभाजी... भाजी कोणतीही असो त्यामध्ये दिसतोच दिसतो. भारतामध्ये बटाटा जणू काही भाजांचा राजा आहे, कारण कोणतीही भाजी त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही असेच म्हणावे लागेल. पण प्रत्येक भाज्यांमध्ये दिसणारा बटाटा मूळचा भारतातील नाहीच. बटाटा परदेशातून भारतात आला. उपलब्ध माहितीनुसार, 16 व्या शतकापर्यंत फक्त पेरूमधील लोकांच्या जीवनात बटाट्याचा समावेश होता. तोपर्यंत इतर संपूर्ण जगाला या पिकाबाबत माहिती नव्हती. पण खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा जगाच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याने समुद्रमार्गे बटाटे जगातील सर्व खंडांमध्ये नेले. दरम्यान, पोर्तुगीज आणि डच व्यापार्यांनी बटाटा भारतात आणला, असेही म्हटले जाते. सर्वात आधी मलबार किनारपट्टीवर बटाट्याचं पीक घेतलं जायचे, त्यानंतर बटाटा बंगाल आणि उत्तर भारतामध्ये पोहोचला. 18 व्या शतकाच्या सुमारास, ईस्ट इंडिया कंपनीला भारतात बटाट्यांचा तुटवडा जाणवू लागला. कंपनी बटाटे युरोपमधून आयात करण्याऐवजी ते भारतातच उगवण्याचे ठरवले. यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने शेतकऱ्यांना स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात बटाट्याची रोपे विकली, त्यानंतर हळूहळू बटाटा हे पीक घरोघरी घेतले जाणारे पीक बनले.