आठवडाभरापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं वाढ होतेय. कच्च्या तेलानं 85 डॉलर्सचा टप्पा ओलांडलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावरच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती निश्चित केल्या जातात. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत, देशात मात्र इंधनाचे दर स्थिर आहेत. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आज जैसे थेच आहेत. वर्षभरात कच्च्या तेलाच्या दरांत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले, पण देशातील पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिरच आहेत. राजधानीत एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.