केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांचं मंगळवारी (18 जुलै) निधन झालं. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते.



केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे 79 वर्षांचे होते.



ओमन चांडी हे राहुल गांधींसोबत भारत जोडे यात्रेतही दिसले होते आणि त्यांनी अलीकडेच केरळमध्ये सर्वाधिक काळ काँग्रेसचे नेते राहण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर जाणून घ्या...



ओमन चांडी यांची राजकीय कारकीर्द 5 दशकांहून अधिक काळ होती. चांडी केरळचे दोन वेळा मुख्यमंत्री होते.



पहिल्यांदा 2004 ते 2006 आणि दुसऱ्यांदा 2011 ते 2016, असे दोन वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यांनी AICC सरचिटणीस म्हणूनही भूमिका बजावली होती.



वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1970 मध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुका जिंकून ते पहिल्यांदा केरळ विधानसभेत पोहोचले, तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.



2022 मध्ये त्यांनी एक खास विक्रम आपल्या नावावर केला. 18,728 दिवस सभागृहात पुथुपल्ली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ते राज्य विधानसभेचे सर्वात जास्त काळ सदस्य राहिले आहे. त्यांनी केरळ काँग्रेस (M) चे माजी प्रमुख आणि दिवंगत केएम मणी यांचा विक्रमही मोडीत काढला.



चांडी यांनी चार वेळा वेगवेगळ्या मंत्रिमंडळात मंत्री आणि चार वेळा विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. केरळमधील काँग्रेसचे प्रबळ नेते अशी त्यांची ओळख होती.



तसेच, राज्यातील बड्या नेत्यांपैकी ते एक होते. ओमन चांडी यांच्यावर बंगळुरूमध्ये कर्करोगावर उपचार सुरू होते, मात्र 18 जुलै रोजी त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.



माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1943 रोजी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव केओ चांडी आणि आईचे नाव बेबी चांडी होते.



ओमन यांनी एर्नाकुलमच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी राजकारणात येण्याचा निर्धार केला होता. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय होते.