एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या राम मंदिरात आज आरती केली. तर उद्धव ठाकरेंनी नाशिकला काळाराम मंदिराला भेट देऊन आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करण्यात आली. ते पूर्व महाद्वारातून काळाराम मंदिरात दाखल झाले. प्रथम त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभू श्रीरामाचे दर्शन त्यांनी घेतले. उद्धव ठाकरेंच्या हस्ते यावेळी महापूजा आणि महाआरती करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भगवे कपडे,गळ्यात रुद्राक्षाची माळ परिधान केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,मुलगा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.