बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. बेस्टमध्ये बाह्य कंपन्यामार्फत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. संप मिटवण्यासाठी शासनाच्या काही हालचाली नाही; त्यामुळे प्रवाशांची फरफट होत आहे. आठवड्यातला पहिला दिवस सोमवार असल्यामुळे रस्त्यावर प्रवास करणाऱ्यांची गर्दी आहे. पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांचा संप सुरु आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे बेस्ट प्रशासनाने व राज्य सरकारने मदतीसाठी एसटी, खाजगी वाहनांमधून टप्पा प्रवासाला परवानगी दिली आहे. मात्र तरीही प्रवाशांची गैरसोय पाहायला मिळत आहे. दरम्यान बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुंबईमधील एकोणीस आगार मिळून शिष्टमंडळ तयार करण्यात आलं आहे. आज हे शिष्टमंडळ पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांचे शिष्टमंडळ भेट घेणार असून मागण्या आणि संपाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.