महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, याची चर्चा गेल्या तीन दिवसांपासून रंगली आहे.
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण यासंदर्भात दिल्लीत गुरुवारी रात्री महायुतीचे प्रमुख नेते आणि अमित शाह यांची बैठक पार पडली.
या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरी त्याची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
या बैठकीपूर्वी अमित शाह एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या बाजूने कौल देऊ शकतात, अशी चर्चा होती.
मात्र, या बैठकीतील छायाचित्रे बाहेर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या बैठकीतील त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव बऱ्याच गोष्टी स्पष्ट करणार होते.
याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज दिल्लीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता.
शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून वातावरणनिर्मिती करुन भाजपवर तसा दबावही टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भाजपश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा संदेश दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली होती.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.
मात्र, दिल्लीच्या कालच्या बैठकीतील त्यांची बॉडी लँग्वेज वेगळेच काही संकेत देणारी ठरली.