जम्मू- काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचा 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण शहीद झाले. शहीद रोमित तानाजी चव्हाण यांचे पार्थिव वाळवा तालुक्यातील शिगाव गावी दाखल झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत रोमित यांना वीरमरण आले होते. आज वारणा नदी काठी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. रोमित यांच्या अंत्यसंस्कार मिरवणुकीचे रोड गावकऱ्यांनी फुलांनी आणि रांगोळीने सजवले आहेत. वीर जवान तुझे सलाम, रोमित चव्हाण अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत. जम्मू- काश्मिरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांमध्ये रोमितचा समावेश आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शोपियां जिल्ह्यातील जैनापुरातील चेरमार्ग भागात काल दुपारी ही चकमक झाली होती.