महाराष्ट्र केसरी अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने 5-4 च्या फरकाने मुंबई पश्चिमचं नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला मात केलंय.
जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे.
याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती.
या कुस्तीत खुल्या म्हणजे 86 ते 125 किलो वजनी गटाच्या माती आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत विजयी झालेले दोन पैलवान आमनेसामने होते.
आंतरराष्ट्रीय दर्जावर कुस्ती खेळलेला पृथ्वीराज हा कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला पैलवान आहे.
पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदर आबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला.
पृथ्वीराज पाटील सध्या पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग सुरु असून अमर निंबाळकर आणि राम पवार त्याचे प्रशिक्षक आहेत.