नांदेड जिल्ह्यातील 91 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे.

मतदानाचा उत्साह असून मतदार केंद्रांवर गर्दी पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी आज 18 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसर तसेच सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे.

याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत. 

या निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यादृष्टीने काही आदेश देण्यात आले आहेत.

आज 18 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून तर सोमवार 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरात काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

सर्व पक्षकारांचे मंडपे,  सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामव्यतिरिक्त व्यक्तींस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील 91 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ज्या ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहे ,अशा मतदान केंद्रासाठी आहे.

हे आदेश आज 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहील.

तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून  मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हे आदेश लागू राहतील.