आयपीएलच्या आजच्या सामन्यात एक रोमहर्षक लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स संघात पाहायला मिळाली. गुजरातने कोलकात्यावर 8 धावांनी विजय मिळवला खरा पण सामना अखेरच्या षटकापर्यंत चुरशीचा झाला. गुजरातने हार्दिकच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. हार्दिकने 67 धावा केल्या पण त्याला साहाने 25 आणि मिलरने 27 धावांची दिलेली साथही महत्त्वपूर्ण ठरली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या केकेआरची सुरुवात खराब झाली असून दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्याने त्यांना मोठा तोटा झाला. केकेआरचे बहुतेक फलंदाज कर्णधार अय्यरसह आज फेल झाले त्यामुळे 157 धावांचे लक्ष्यही त्यांना गाठता आले नाही. केकेआरची सर्वात मोठी आशा असणाऱ्या रसेलने सामना जिंकवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्याने 25 चेंडूत 48 धावांची खेळी केली खरी पण तो विजय मिळवून देऊ शकला नाही. केकेआरची सुरुवातीची फळी फेल झाल्याने अखेरच्या षटकांमध्ये संघावर मोठे दडपण आले होते. गुजरातने अखेरपर्यंत अप्रतिम गोलंदाजी केल्याने केकेआर 8 धावांनी पराभूत झाली.