केरळमध्ये आभाळ फाटलंय. संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत.

परतीच्या पावसामुळं अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलनामुळे अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. केरळच्या पाच जिल्ह्यांत दोन दिवस रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील गंभीर पूरस्थिती पाहता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लष्कराला पाचारण करण्याची विनंती केली असून अनेक भागांत लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळ किनारपट्टीवर पोहोचलं आहे.

मुळे केरळात पावसाचा जोर वाढला आहे. सध्या दक्षिण आणि मध्य केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्रिवेंद्रम, कोल्लम, पदानमटिट्टा, कोट्टायम, इडुक्की जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोट्टायम जिल्ह्यातच आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला असून 13 जण अद्याप बेपत्ता आहेत.

केरळात पुरामुळं परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. रविवारी आणि सोमवारी संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच अनेक भागांत मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. लष्कराची एक तुकडी कोट्टायममध्ये तैनात आहे. तर दुसरी तुकडी त्रिवेंद्रममध्ये तैनात आहे.

एनडीआरएफची 7 पथकांनीही मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. एअर फोर्सलाही मदत कार्यासाठी तयार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.