सतत वादग्रस्त वक्तव्य, टिपण्णी आणि समाज माध्यमांवरील विविध पोस्टमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सोशल मीडियावर शीख समुदायाची खलिस्तान्यांशी तुलना केल्याप्रकरणी नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून कंगनानं ही याचिका दाखल केली असून त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी कंगानानं इन्स्टाग्रामवर शीख समुदायाबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य केली होती.
कंगनानं केलेल्या या वक्तव्यांमुळे शीख समाजातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.
मुंबई आणि दिल्लीतील विविध गुरुद्वारांच्या समित्यांचे सदस्य असलेले अॅड. अमरजितसिंग कुलवंतसिंग संधू, मनजिंदर सिंग सिरसा आणि जसपाल सिंग सिद्धू यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जाणूनबुजून आणि द्वेषयुक्त पद्धतीनं तसेच धार्मिक भावना भडकावण्याच्या हेतूने भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (अ) अंतर्गत मुंबई पोलिसांनी कंगनावर गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करत कंगनानं अॅड. रिझवान सिद्धिकीमार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
कलम 295 (अ) अंतर्गत किंवा अन्य कोणताही कलमातंर्गत याप्रकरणी खटला चालविता येणार नाही. सदर पोस्ट ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर बंदी घालण्यात आलेल्या एका संघटनेच्याविरोधात होती.