आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून हिवाळ्याच्या दिवसात अनेकजण मेथीचे आणि डिंकाचे लाडू बनवतात. मात्र झाडापासून हा डिंक मिळविण्यासाठी आता झाडाला रासायनिक इंजेक्शन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आला आहे. त्यामुळं हा असा डिंक खाणे आरोग्यासाठी घातक तर ठरत नाही ना? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. थंडीचा जोर वाढला की पौष्टिक आहार म्हणून सुका मेवा घालून साजूक तुपात मेथीचे आणि डिंकाचे लाडू खाण्यासाठी बनवले जातात. हिवाळ्यात हे लाडू खाल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होत असल्याचं सांगितले जाते. या दिवसात कोणतेही सुका मेव्याचे लाडू तयार करताना त्यामध्ये पौष्टिक आणि आरोग्यदायी म्हणून डिंकाचा वापर केला जातो. मात्र हल्ली डिंक मिळणं अवघड काम ठरू लागले आहे. यावर काही जणांनी उपाय शोधून काढला असून पारंपरिक पद्धतीने झाडाला कुऱ्हाडीने खाच मारून त्यात रासायनिक इंजेक्शन दिलं जात आहे. इंजेक्शन देऊन कमी कालावधीत अधिक डिंक मिळविण्याचे तंत्र विकसित केल्याने डिंक उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डिंक मिळविण्यासाठी झाडाला रासायनिक इंजेक्शन दिले जाऊन काही जण डिंक उत्पादन करत असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. झाडांना इजा पोहोचवल्याप्रकरणी आम्हाला कुणी आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा वन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.