तब्बल 73 वर्षानंतर थॉमस कपच्या अंतिम सामन्यात पोहोचत भारताने इतिहास रचला. फायनमध्ये इंडोनेशियाला मात देत भारताने चषकावर नाव कोरलं आहे. यावेळी भारतीय बॅडमिंटन संघातील सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. सर्व खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने हा इतिहास रचला आहे. सर्वात आधी पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने सामना जिंकला. तिसऱ्या सामन्यातही किंदम्बी श्रीकांतने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला मात देत सामना जिंकला. दुसऱ्या पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने विजय मिळवला. या विजयानंतर सर्वच स्तरातून भारतीय बॅडमिंटन संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा तर जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पहिलं वहिला चषक मिळवला.