पॅरिसमध्ये पॅरिलिम्पिक स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नेहमीप्रमाणे भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूंसोबत संवाद साधला. यावेळी भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नवदीप सिंगसोबतच्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. नरेंद्र मोदी आणि नवदीप सिंग यांच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. नवदीप सिंगचा थ्रो फेकल्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्याने आक्रमक अंदाजात काही अपशब्दही उच्चारले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचार फूट उंचीच्या नवदीप सिंगचा विशेष सन्मान केला. यावेळी नवदीपने पंतप्रधान मोदींना टोपी घालण्याची विनंती केली. नरेंद्र मोदी खाली बसले आणि नवदीपने नरेंद्र मोदींना टोपी घातली, तसेच आपल्या जर्सीवर त्यांचा ऑटोग्राफही घेतला.