इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळल्यानंतर दोन्ही देशांतील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. येत्या 7 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना भारतीय संघाला दिलासा देणारी माहिती समोर आलीय. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून तो सराव करण्यासाठी मैदानात उतरलाय. रोहित शर्मानं रविवारी नेटमध्ये बऱ्याच वेळ सराव केला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रोहित शर्माला बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं लिसेस्टाशायर संघाविरुद्ध सराव सामना खेळला होता. या सराव सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचा भाग होता. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती.