राजकोट येथे पार पडलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात (India vs South Africa) भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खानने महत्त्वाची भूमिका बजावली.



या सामन्यात त्यानं 18 धावा देऊन चार फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या विजयाचा पाया रचला.



दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात आवेश खानला एकही विकेट्स मिळवता आली नव्हती.



ज्यामुळं त्याला भारतीय संघातून वगळलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, भारतीय संघ व्यवस्थापनानं त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला चौथा सामना खेळण्याची संधी दिली.



या सामन्यात चार विकेट्स घेऊन आवेश खाननं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. या सामन्यात त्यानं केलेली लक्ष वेधीत कामगिरी त्याच्या वडिलांना समर्पित केलीय.



दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात आवेश खानला एकही विकेट्स मिळवता आली नाही. ज्यामुळं सोशल मीडियावर त्याच्या कामगिरीवर टीका केली जात होती.



मात्र, चौथ्या टी-20 सामन्यात आवेश खाननं आक्रमक रूप धारण करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच कंबरडं मोडलं. या सामन्यात त्यानं चार षटक टाकली. ज्यात 18 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या.



या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकलं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.



भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं.



आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 87 धावांत ऑलआऊट झाला आणि भारतानं हा सामना 82 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला.