ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या 24 व्या मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये भारताने आणखी एक सुवर्णपद जिंकलं आहे. गोल्फर दिक्षा डागरने या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. दिक्षा डागरने अंतिम फेरीत अमेरिकेच्या ऍशलिन ग्रेसचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे दिक्षाने 2017 सालच्या मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवल्याने दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारी ती पहिली गोल्फर ठरली आहे. श्रवणदोष असणारी दिक्षाने वयाच्या सहाव्या वर्षापासून श्रवणयंत्र वापरण्यास सुरुवात केली. पण बालपणीपासूनच खेळाची आवड असलेल्या दीक्षाने गोल्फ खेळात आजवर उत्तम कामगिरी केली आहे. 21 वर्षीय डावखुऱ्या दिक्षाने अनेक आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धांमध्ये महिला गटात अप्रतिम कामगिरी केली आहे. अनेक युरोपियन देशात तिने विजय मिळवला आहे. 2021 मध्ये, दिक्षा टोकियो ऑलिम्पिकसाठी शेवटच्या क्षणी पात्र ठरली आणि डेफलिम्पिक आणि ऑलिम्पिक या दोन्ही खेळांमध्ये खेळणारी पहिली गोल्फर बनली आहे. दिक्षाच्या आधी नुकतंच या स्पर्धेत भारताच्या धनुष श्रीकांतने 10 मीटर एअर रायफल शूटींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे.