हिवाळ्यात थंडी लागल्याने अनेकदा आपल्याला हुडहुडी भरते. पण, असं का होतं याचा तुम्ही विचार केला आहे का? नसेल तर याबाबत जाणून घ्या. थंडी वाजल्यावर हुडहुडी भरण्यामागे शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण थंड वातावरणात असतो किंवा आजारी असतो तेव्हा आपलं शरीर त्याचं अंतर्गत तापमान राखण्यासाठी प्रयत्न करत असते. आपले शरीर एका विशिष्ट तापमानात उत्तम काम करते. जेव्हा आपल्या शरीराचे तापमान कमी होऊ लागते, तेव्हा तापमान वाढवण्यासाठी शरीर अनेक पद्धती अवलंबते. यातील एक पद्धत थरथर कापणे यालाच हुडहुडी असंही म्हणतात. थरथरणे ही खरं तर आपल्या शरीराची स्वयंचलित प्रतिक्रिया आहे. जेव्हा आपल्या शरीराला थंडी जाणवते तेव्हा मेंदू एक संदेश पाठवतो. ज्यामुळे स्नायू आकुंचन पावतात आणि वेगाने विस्तारतात. हे आकुंचन आणि विस्तार वेगवान होतात आणि हे हादरे जाणवणे म्हणजेच हुडहुडी भरते.