कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत नाहीय त्यातच आता आणखी नव्या विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे.
मध्य आफ्रिकन देशांमध्ये मारबर्ग विषाणू पसरत आहे. हा नवा विषाणू कोरोना व्हायरस आणि इबोला व्हायरसपेक्षाही धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे.
आफ्रीकेकडील देशांमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूमुळे दहशत निर्माण झाली आहे.
मारबर्ग विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
दरम्यान बैठक बोलावण्याआधी WHO च्या अधिकाऱ्यांनी या विषाणू संसर्गाच्या गंभीरतेबाबत चर्चा केली होती.
घानामध्ये धोकादायक मारबर्ग व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती WHO ने दिली आहे.
WHO नं सांगितलं की, मारबर्ग विषाणू रोग हा एक विषाणूजन्य रोग आहे. यामुळे ताप येतो आणि शरीरांतर्गत रक्तस्राव होतो.
या विषाणू संसर्गाचा मृत्यू दर 88 टक्के इतका जास्त आहे. मारबर्ग विषाणू आणि इबोला विषाणू एकाच कुटुंबातील विषाणूचे वेगवेगळे प्रकार आहेत.
1967 मध्ये जर्मनीतील मारबर्ग आणि फ्रँकफर्ट आणि सर्बियातील बेलग्रेड येथे या रोगाचा संसर्ग आढळून आला.
माणसाला मारबर्ग विषाणूची लागण कशी झाली, याबाबत स्पष्ट माहिती नाही. पण हा विषाणू वटवाघळांमुळे पसरल्याचं म्हटलं जातं.
2008 मध्ये, युगांडामध्ये रुसेटस बॅट वसाहतीमधील गुहेला भेट देणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये या विषाणूचा संसर्ग सापडला.