आपण मुलांना काही खाण्यापासून थांबवतो, तेव्हा मुलही हे सहज मान्य करत नाहीत. त्यातच जर तुमच्या मुलाला मधुमेह (Diabetes) असेल, तर त्याच्या आहाराकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागतं.
सकस आहार हा साखरेवर नियंत्रण ठेवण्याचा सोपा मार्ग आहे. मधुमेह असलेल्या लहान मुलांना योग्य आहार देणं थोडं कठीण आहे, परंतु अशक्य नाही.
काही सोप्या मार्गांबद्दल जाणून घ्या ज्याद्वारे तुम्ही मधुमेह असलेल्या मुलांनाही चविष्ट आहार देता येईल.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सहा महिने ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना टाइप 1 मधुमेहाची समस्या होऊ शकते. दरम्यान, लहान मुलांमध्ये टाइप 1 मधुमेहाचा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो.
तसेच, मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येमुळे टाईप 2 मधुमेहाच्या प्रकरणांमध्येही वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
मधुमेहाचा त्रास असलेल्या मुलांना गोड पेयांपासून दूर ठेवावं. ज्यूस, लस्सी आणि कार्बोनेटेड पेयं टाळा. तसेच, कुकीज आणि नट्ससह तळलेलं अन्नपदार्थ दूर ठेवा.
यामुळे शरीरात ट्रान्सफॅटचं प्रमाण वाढतं. या खाद्यपदार्थांमुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
डॉक्टरांच्या मते, तुमच्या मुलाला मधुमेह असेल तर, बाहेरचे अन्नपदार्थ देण्यापेक्षा तुम्ही घरी तयार केलेले अन्न देण्यास प्राधान्य द्या.
बाहेरचे अन्नपदार्थ शक्यतो टाळा. फास्टफूडमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. यामुळे वजन वाढण्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते.
त्यामुळे घरात बनवलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांना अधिक प्राधान्य दिलं पाहिजे.