इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना नॉटिंगहॅम येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसननं आणखी एक पराक्रम करून दाखवलाय. नॉटिंगहॅम कसोटीच्या चौथ्या दिवशी टॉम लॅथमला बाद करून ॲंडरसननं कसोटी क्रिकेटमधील 650 विकेट्सचा टप्पा पूर्ण केलाय. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरलाय. याशिवाय त्यानं आणखी एक खास विक्रमाला गवसणी घातलीय. वयाचे 30 वर्षे ओलांडल्यानंतर 100 कसोटी सामने खेळणारा ॲंडरसन जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरलाय. इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक अॅलेक स्टीवर्टनं वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. त्याचबरोबर या यादीत सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे 95-95 कसोटी सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ 92 कसोटी सामन्यासह चौथ्या क्रमांकावर आहे. ॲंडरसन ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, त्यावरून असे दिसते आहे की तो पुढील किमान दोन-तीन वर्षे कसोटी क्रिकेट खेळत राहील. ॲंडरसनला आता ॲलेक स्टुअर्टला मागं टाकून या बाबतीत विश्वविक्रम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.