शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्षासाठी अनेकवेळा रक्त सांडलेल्या माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींवरील शेतकऱ्यांचे प्रेम काही नवीन नाही.



लोकवर्गणी काढून राजू शेट्टींना खासदार करणाऱ्या शेतकऱ्यांनी पै पै गोळा करून नवी कोरी अलीशान फॉर्च्युनर कार भेट दिली आहे.



त्यामुळे राजू शेट्टी चांगलेच भारावून गेले आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविकांत तुपकर यांनाही लोकवर्गणीतून कार भेट दिली आहे.



एकाचवेळी दोघांना कार लोकवर्गणीतून देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांवरील प्रेम अधोरेखित केलं आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



राजकीय नेत्यांचा राजेशाही थाट आणि त्यांचा अलीशान गाड्यांचा थाट सर्वसामान्यांचे डोळे चांगलेच विस्फावून जातात.



मात्र, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत असलेल्या राजू शेट्टी यांचा प्रवास याला नक्कीच अपवाद राहिला आहे.



पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मात्तबरांविरोधात लढण्यासाठी खासकरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांना नेहमीच शंभर हत्तीचे बळ दिले आहे.



त्यामुळेच राजू शेट्टींचा प्रवास खासदारकीपर्यंत पोहोचला. राजू शेट्टी यांनी 2009 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शड्डू ठोकल्यानंतर शेतकऱ्यांनीच लोकवर्गणी काढून त्यांना आर्थिक पाठबळ दिले होते.



कार्यकर्त्यांनी दिलेल्या या अलीशान भेटनंतर दस्तुरखुद्द राजू शेट्टी चांगलेच भारावून गेले आहेत.



त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून आभार मानले आहेत. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर.