केवळ छोटा पडदाच नव्हे तर, मोठ्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवणाऱ्या अभिनेत्री दिव्या दत्ता हिचा आज (25 सप्टेंबर) वाढदिवस आहे. 25 सप्टेंबर 1977 रोजी लुधियानामध्ये जन्मलेली दिव्या यावर्षी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिव्या दत्ताचे नाव अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये गणले जाते, ज्यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले. दिव्या ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने प्रसिद्धीचा विचार न करता प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या दिव्याने टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते. मालिकांमध्ये काम करत असताना 'कसूर' या चित्रपटासाठी तिने आपला आवाजही दिला होता. दिव्या दत्ताने 'इश्क में जीना इश्क में मरना' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सलमान खानच्या ‘वीरगती’मधील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली. यानंतर, ‘वीर झारा’ या चित्रपटातील ‘शब्बो’ या व्यक्तिरेखेतून दिव्याने केवळ प्रेक्षकच नव्हे तर, समीक्षकांची देखील वाहवा मिळवली.