बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं.
शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला आहे.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे आई-वडील आणि लहान भावाशी मोबाईल फोनवरुन संपर्क साधण्यात आला.
अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
'एबीपी माझा' शी बोलताना अक्षयच्या कुटुंबियांनी असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं सांगितलं.
अक्षयचं काम बाथरूम सफाईचे आहे, तो बाथरुममध्ये कसा जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करा, अशी मागणीही अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केली आहे.
बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूर पूर्वच्या खरवई गावातला रहिवासी आहे.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयची तीन लग्न झाली होती. पण त्याची एकही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नसल्याचंही शेजाऱ्यानं सांगितलं.
गावकऱ्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली, भितीनं अक्षयचं कुटुंब तिथून पळून गेल्याची माहिती मिळतेय.