देशात एकीकडे H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू वेगाने पसरतोय, तर दुसरीकडे कोरोना विषाणू पुन्हा डोकं वर काढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे. देशात H3N2 इन्फ्लूएंझाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशातील अनेक भागात कोविड-19 विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 109 दिवसांनंतर देशात कोविड-19 चे 5000 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी 17 मार्च रोजी एका दिवसात कोरोना विषाणू संसर्गाच्या 796 प्रकरणांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 17 मार्चपर्यंत देशात सक्रिय रुग्णांची संख्या 5,026 वर पोहोचली आहे. तसेच पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या 5,30,795 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी 16 मार्च रोजी एकूण 98,727 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 220 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.