देशात दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूचा हा वाढता प्रादुर्भाव ही एक चिंताजनक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात 2 हजार 139 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद आणि 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीच्या दिवशी देशात 1 हजार 957 नवीन रुग्णांची नोंद आणि 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सलग तीन दिवस कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर आज पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख वाढला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे देशातही आता कोरोनाच्या पाचव्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात चौथ्या लाटेनंतर आता कुठे कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत होता. मात्र, कोरोना रुग्णसंख्येतील चढउतार कायम आहे.