जगभरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असताना मात्र भारतासाठी दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 128 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर, सध्या देशात 1,998 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत चार कोटीहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच एकूण 5,30,728 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. देशात सोमवारी 100 हून कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मार्च 2020 नंतर सोमवारी सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना संसर्ग घटताना दिसत आहे. 29 जानेवारी 2020 रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, त्यानंतर मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. देशात सोमवारी 16 जानेवारी रोजी 83 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यापूर्वी 15 जानेवारी रोजी कोरोनाचे 114 रुग्ण आढळले होते. भारतात 27 मार्च 2020 रोजी पहिल्यांदा 24 तासांत 100 हून अधिक कोरोना सापडले होते आणि तेव्हापासून कोरोनाचा आलेख सतत वाढता होता. तब्बल दोन वर्षानंतर 16 जानेवारीला हा आलेख 100 च्या खाली पोहोचला होता, ही भारतीयांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. याशिवाय अमेरिका, जपान, दक्षिण कोरियामध्येही कोरोना संसर्गाची लाट पाहायला मिळत आहे. याउलट भारतात रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. पण संसर्ग घटल असला, तरी धोका कायम आहे, त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.