जगभरात कोरोनाच्या XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे. यासोबतच भारतातही या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. मात्र, देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होणे, ही एक दिलासादायक बाब आहे. देशात आज 89 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मार्च 2020 नंतर पहिल्यांदा देशातील कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या खाली पोहोचली आहे. कोरोना लाटेच्या काळात रुग्णांचा आकडा लाखापर्यंत पोहोचला होता. सध्या देशात 2,035 सक्रिय रुग्ण आहेत. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा चार कोटींच्या पार गेला आहे. देशात एकूण 4,46,81,233 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 89 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच आतापर्यंत कोरोना विषाणूने 5,30,726 रुग्णांचा बळी घेतला आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहता खबरदारी म्हणून ही पाऊले उचलली जात आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर कोविड चाचणी करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येत आहेत. देशात सध्या XBB.1.5 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. याशिवाय BF.7 व्हेरियंटचे भारतात 14 रुग्ण सापडले आहेत.